काँग्रेसकडून आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागेपर्यंत भाजपा नेते, आमदार, खासदारांच्या घरापुढे, भाजपा कार्यालयांपुढे आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानुसार नाना पटोले तसंच भाई जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन कऱण्यात आलं. दरम्यान या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद लाड यांनी जशास तसं उत्तर दिलं जाईल असं आव्हान दिलं होतं. आंदोलनानंतर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी प्रसाद लाड यांना टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे सोमवारी सकाळी आंदोलन करण्याची तयारी काँग्रेसने केली होती. दरम्यान प्रसाद लाड यांनी हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं आव्हान दिलं होतं. काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याची भाजपानेही तयारी केली होती. शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी फडणवीस यांच्या घरापुढे जमले होते.
प्रसाद लाड काय म्हणाले होते ?
“नाना तुझ्या आव्हानाला प्रतीआव्हान देत आहे. हिंमत असेल तर उद्या सकाळी १० वाजता येऊन दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपावासी नाही. सागरवर ये, परत कसा जातो ते मी पाहतो,” असा एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला होता.
अतुल लोंढेंचं उत्तर-
“सागर लाडजी तुम्ही दिलेल्या आव्हानाप्रमाणे मी सागर बंगल्यावर आलो आणि महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला, एक नाही तर अनेक वेळा केला. पोलिसांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरीही एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. तुम्ही म्हणाले होते सागर बंगल्यावर आलात तर परत जाऊ देणार नाही मी परतही आलो पण तुम्ही काही दिसला नाहीत. कुठे गेला होतात?,” अशी विचारणा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
मोदी माफी मागणार नाहीत – फडणवीस
“कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही,” असं फडणवीस सागर निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले आहेत.
काँग्रेसकडून आंदोलन स्थगित
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तात्पुरतं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. “महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांचा, विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. ही महाराष्ट्रद्रोही भाजपा असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे,” असं नाना पटोले म्हणाले. आंदोलनाची पुढील तारीख आम्ही सांगू असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आमचं आंदोलन झालं आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपाच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवलं. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही”.
“भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला आहे. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, राज्यातील सर्व संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल पण आम्ही मोदींचं समर्थन करुन अशी भाजपाची वृत्ती आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही आंदोलन मागे घेतलं नसून लोकांची गैरसोय म्हणून ते तात्पुरतं स्थगित केलं आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.