आगामी लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाशी आघाडी करण्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तयारी दर्शविल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पुढील वाटाघाटीमध्ये भारिपच्या वतीने लोकसभेच्या दोन जागा सोडण्याचा काँग्रेसकडे आग्रह धरला जाणार असल्याचे समजते.
राज्यात दीड वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी काँग्रेस व भारिप-बुहजन महासंघ यांच्यात समझोता झाला होता. निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या, तशा काँग्रेसमध्ये पुन्हा हालचाली सुरू झाल्या. गेल्याच आठवडय़ात झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे यांच्याबरोबर युती करण्याची ठाकरे यांनी जाहीर भूमिका मांडली होती.  
मुख्यमंत्र्यांबरोबर अगदीच प्राथमिक चर्चा झाली, पुढील वाटाघाटीत याबाबत सविस्तर चर्चा होईल, असे पक्षाचे सरचिटणीस बाबुराव पोटभरे यांनी सांगितले. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अकोला व दक्षिण-मध्य मुंबई या दोन जागा भारिपला दिल्या होत्या. या वेळीही अकोला व अन्य एका जागेची मागणी केला जाणार आहे. दुसरी जागा म्हणून बुलढाणा किंवा वर्धा लोकसभा मतदारसंघ मागितला जाऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा