देखो, उडन खटोला.. उत्तर प्रदेशातील एका गावातील मुलांनी एकच गलका केला.. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले, त्यातून बाहेर आलेल्या नेत्याने सुहास्य वदनाने हारतुरे स्वीकारले आणि गाडीत बसून तो सभास्थानी रवाना झाला.. सभेनंतर लगेचच दिल्लीला परतायचे असल्यामुळे तेथून थोडय़ा अंतरावर छोटेखानी विमान तयारच होते.. लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त आकाशात विमानांच्या घिरटय़ा प्रचंड वाढल्या असून ‘उडन खटोला’चा व्यवसाय करणाऱ्यांनाही सध्या चलतीचे दिवस आले आहेत.
‘चॅलेंजर ६०५’ ने आकाशात झेप घेतली तशी विमानात बसलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सहाय्यकाने पुढील सभेच्या ठिकाणी करावयाच्या भाषणातील मुद्दयांची फाइल हातात दिली. मोदींनीही विमानातून बाहेर एक नजर टाकत फाइलवर लक्ष केंद्रित केले. तासाभरात विमान सभेच्या ठिकाणी आले आणि ‘मित्रो’.. असे आवाहन करत उत्तर प्रदेशमधील प्रश्नांना मोदींनी सहज हात घातला.. भाषण संपले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून दुसऱ्या सभेसाठी मोदी रवाना झाले तेव्हा त्या सभेतील मुद्दय़ांचे छोटेखानी टिपणही  त्यांच्यासाठी तयारच होते..
काँग्रेसचे राहुल गांधी असोत की भाजपचे मोदी, सर्वच ‘स्टार’ प्रचारक छोटय़ा विमानातून प्रवास करतानाच सभेसाठी आवश्यक माहिती वाचण्यात वेळ घालवतात, असे हेलिकॉप्टर भाडय़ाने देण्याचा गेले दशकभर व्यवसाय करणारे विक्रांत चांदवडकर यांनी सांगितले. या उलट राज्य पातळीवरील नेत्यांचे दौरे अधिक वेगवान तसेच कमी विश्रांतीचे असल्यामुळे अनेकदा राज्य पातळीवरील नेते डोळ्यावर काळी पट्टी बांधून हेलिकॉप्टरमध्ये झोप काढणे पसंत करतात. काही वेळा सभेचे ठिकाण गावाजवळ आणि वेळ सायंकाळची, परिणामी वैमानिकाला हेलिपॅड शोधण्यात अडचण येत असल्याचे दिसताच शरद पवारांसारखे नेते अचूक जागा वैमानिकाला दाखवतात.

पक्षांची तारांबळ
सध्या प्रचारासाठी देशभरात २५०हून अधिक हेलिकॉप्टर्स आकाशात फिरत आहेत. हे उडन खटोले प्रमुख पाच-सात ठेकेदारांच्या माध्यमातून पक्षांना पुरविण्यात येतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत हवाई प्रवासासाठी आचारसंहितेचा कोणताही त्रास नव्हता. मात्र या वेळी आयोगाच्या परवानगीसाठी पक्षांची तारांबळ उडत आहे.

हवाई बजेट
बहुतांश छोटय़ा विमानांचे सर्वसाधारण भाडे हे प्रतितास ५५ ते ६० हजार एवढे असते. सध्या हेच भाडे ८५ हजार रुपये प्रतितास आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या विमानांचा दर्जा अधिक चांगला असल्यामुळे त्याचे भाडे प्रतितास दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत असते. एकीकडे काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई, तर दुसरीकडे मोदीज्वरामुळे राजकीय नेत्यांना चॉपरची कमतरता भासत आहे. राष्ट्रीय पक्षांकडे पैसा हा प्रश्न नाही, भाजप व काँग्रेसचे ४५ दिवसांचे राष्ट्रीय नेत्यांसाठी हवाई प्रवासाचे बजेट ५० ते ८० कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.