बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. निवडणुकांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यातच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. परंतु या मुलाखतीकडे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, काँग्रेसचे काही नेते येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता भाजपापाठोपाठ शिवसेनेतही ‘मेगाभरती’ होते की काय असा सवाल सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या टिळक भवनात मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी उमेदवारीसाठी अर्जच केला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर असलम शेख हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगत आहे. असलम शेख, कृपाशंकर सिंग, वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल या नेत्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली.

दरम्यान, या मुलाखतीला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. परंतु हे नेते गैरहजर राहिल्याने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Story img Loader