प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आज ठरणार
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर युती करायची की पुन्हा डाव्या पक्ष-संघटनांना एकत्र करुन तिसरी आघाडी उभी करायची, याबाबत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सोमवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आधीच शिवसेना-भाजपबरोबर युती केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर आंबेडकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी साथ सोडून डावी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका निवडणुकीनंतर तो प्रयोग अर्धवट सोडून त्यांनी शिवसेना-भाजपशी युती केली. त्या पक्षांसोबत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढविल्या आणि आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकाही महायुतीतच राहून लढविण्याची त्यांनी घोषणा केली आहे. आठवले यांच्या या निर्णयावर भारिप बहुजन महासंघाची प्रतिक्रिया कडवट आहे. दोन-चार जागांची भीक मागून राजकारण करायचे आहे त्यांनी ते जरुर करावे, भारिप-बहुजन महासंघ मात्र स्वाभिमानी राजकारण करणार, असे  पक्षाच्या प्रवक्तया डॉ. उज्वला जाधव यांनी सांगितले. गेल्या वर्षी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाने काँग्रेसशी हातमिळवणी करुन जिल्हा परिषदा व काही महानगरपालिकांच्या निवडणुका लढविल्या होत्या. ही युती लोकसभा व विधानसभा निवडणुकांपर्यंत कायम ठेवावी, अशी दोन्ही पक्ष नेतृत्वाची इच्छा होती. त्यानुसार अलीकडे काँग्रेस व भारिपच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चाही झाली. परंतु काँग्रेसकडून सन्मान्य युतीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने भारिप-बहुजन महासंघाने आपली स्वतंत्र आघाडी उभी करण्याचेही प्रयत्न चालू ठेवले. त्यानुसार गेल्या तीन-चार महिन्यात  आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई व पुणे येथे डावे पक्ष व इतर सामाजिक-आर्थिक प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनांच्या अनेकदा बैठका झाल्या. मराठा समाजाच्या काही संघटनाही आंबेडकर यांच्या संपर्कात आहेत. या पाश्र्वभूमीवर उद्या प्रकाश आंबेडकर निवडणुकांच्या संदर्भात काय भूमिका जाहीर करणार, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.