मुस्लीम, दलित तसेच इतर मागासवर्गीय हे सारेच घटक विरोधात गेल्याने लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली राज्यातील काँग्रेसच्या पराभवाची मालिका अद्यापही खंडित झालेली नाही. अल्पसंख्याकांचा कल एमआयएमकडे अधिक असल्याचे वांद्रे पूर्व आणि औरंगाबादच्या निकालांवरून स्पष्ट झाले असून, ही बाब भविष्यातील राजकीय वाटचालीकरिता काँग्रेसला चिंतेची ठरणार आहे.
दोन महानगरपालिका आणि सात नगरपालिकांच्या निवडणुकीत भोकरचा अपवाद वगळता काँग्रेसचा साऱ्याच ठिकाणी धुव्वा उडाला. गेल्याच आठवडय़ात वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही पराभव झाला. यापाठोपाठ दोन्ही महापालिकांमध्ये जेमतेम दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली अपयशाची मालिका सुरूच आहे. राज्यात काँग्रेसबद्दल मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण नाही असेच संकेत यातून मिळतात. मुस्लीम, दलित तसेच समाजातील दुर्बल घटकांची मोठय़ा प्रमाणावर मते काँग्रेसच्या पारडय़ात पडत असत. या हक्काच्या मतपेढीमुळे काँग्रेसला विजयाचे गणित साधणे सोपे व्हायचे. पण दलितांची मते दूर गेली. मुस्लीम समाजात काँग्रेसबद्दल विरोधाची भावना तयार झाली. अल्पसंख्याकांची हक्काची मते गेल्याने काँग्रेसचे सारेच गणित बिघडले.
काँग्रेसला रोखायचे असल्यास या पक्षाच्या मतपेढीला धक्का लावण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न भाजपने केले. एमआयएमला ताकद मिळेल या पद्धतीने प्रयत्न झाले. राज्य विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकबहुल किंवा लक्षणीय मते असलेल्या मतदारसंघांमध्ये एमआयएमचे उमेदवार ‘ताकदवान’ होतील याची खबरदारी घेण्यात आली. त्याचा काँग्रेसला चांगलाच फटका बसला होता. औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांच्या माध्यमातून काँग्रेसने राजकारण केले. हा मतदार दूर गेल्याने काँग्रेसची पीछेहाट झाली. वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतही गतवेळच्या तुलनेत मते कमी झाली असली तरी एमआयएमने मुस्लीम मतदारांवरील आपली छाप कायम ठेवली होती.
हक्काची मतपेढी दूर गेल्याबरोबरच सर्वसामान्य मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अद्यापही काँग्रेसला यश आलेले नाही. यूपीए सरकारच्या काळातील घोटाळे, भ्रष्टाचार यामुळे काँग्रेसबद्दल असलेली तिडीक अजूनही कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीपासून वर्षभरात झालेल्या साऱ्याच निवडणुकांमध्ये काँग्रेसला (एखाद दुसरा अपवाद वगळता) पराभवाला सामोरे जावे लागले.

चिंतेची बाब -अशोक चव्हाण
भोकरचा अपवाद वगळता आठ ठिकाणच्या निवडणुकांमध्ये पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. मतदारांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही कमी पडतो हेच यावरून सिद्ध होते. विशेषत: अल्पसंख्याक तसेच अन्य पक्षांची पारंपरिक मतपेढी आमच्यापासून दूर गेली आहे. ही काँग्रेससाठी चिंतेची बाब असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. या साऱ्या समाज घटकांचा विश्वास संपादन करण्याकरिता आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. हळूहळू केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती होत आहे. भविष्यात सारे चित्र बदलेल आणि काँग्रेसला वातावरण अनुकूल होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.