गुरूदास कामत यांच्या समर्थनार्थ मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने मुंबई काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. हे सर्व नगरसेवक आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. असे झाल्यास आगामी वर्षातील महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्वावर नाराज असलेल्या गुरूदास कामत यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. कामत यांच्या या घोषणेने काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. कामत यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांच्या समर्थकांनी चेंबूर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तिप्रदर्शन केले होते. पण कामत कोणालाच भेटले नाहीत. अगदी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी कामत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्कच झाला नाही. मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कामत काँग्रेसला घरबसल्या त्रास देऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची अवस्था बुडत्या नौकेसारखी! 
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि कामत गटात गेल्या काही दिवसांत वितुष्ट असल्याचे दिसून आले होते. मुंबईतील ब्लॉक अध्यक्षांची निवड करताना निरुपम यांनी कामत गटाच्या कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवले होते. या पार्श्वभूमीवर कामत यांनी पक्षनेतृत्वाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कामत यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.  आतापर्यंत केंद्रीय मंत्री, अ. भा. युवक काँग्रेस, मुंबई काँग्रेस अशा पदांचा राजीनामा दिल्यावर त्या निर्णयाचा फेरविचार करण्यास त्यांनी ठाम नकार दिला होता. या पाश्र्वभूमीवर राजकीय संन्यासाच्या घोषणेचा फेरविचार करण्याची शक्यता कमीच आहे.

Story img Loader