प्रफुल्ल पटेल आणि अहमद पटेल यांच्या भेटीनंतर सारे काही आलबेल व्हायचे, सोनिया गांधी त्यावर शिक्कामोर्तब करणार ही गेली दहा वर्षे सुरू असलेली प्रथा-परंपरा राहुल गांधी यांना मान्य नसल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाचे सारे घोडे अडले आहे. काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लवकर निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल हे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत काँग्रेसबरोबर आघाडी या विषयावर चर्चा झाली. काँग्रेस नेत्यांच्या मनात काय घोळत आहे, असा शंकेचा सूर होता. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीबाबत दोन महिने आधी जागावाटपांची चर्चा सुरू झाली होती. तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आघाडी आणि जागावाटपाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. जागावाटपाची चर्चा सुरू व्हावी, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली.
जागावाटपाची चर्चा लवकर झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. काँग्रेसकडून काहीच पुढाकार घेतला जात नाही. महायुतीचे मेळावे, सभा सुरू झाल्या आहेत. आघाडीची निदान जागावाटपाची चर्चा तरी सुरू झाली पाहिजे, असे पटेल यांनी सांगितले. काँग्रेसने २७-२१चे सूत्र मांडले आहे याकडे लक्ष वेधले असता पटेल म्हणाले, आधी चर्चा झाली पाहिजे. मग पुढे निर्णय घेतला जाईल. जागावाटपाची चर्चा मुंबईत होणार नाही तर दिल्लीतच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२२ मतदारसंघांचा आढावा किंवा राजकीय परिस्थिती जाणून घेण्याकरिता मंत्री आणि पदाधिकाऱ्यांवर मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बारामती आणि परभणी या दोन मतदारसंघांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नाशिकची जबाबदारी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका-पुतण्याकडेच ठेवण्यात आली. ठाणे (गणेश नाईक), कल्याण (वसंत डावखरे), मावळ (सुनील तटकरे), शिरुर (दिलीप वळसे-पाटील), हातकणंगले (जयंत पाटील), नगर (मधुकरराव पिचड आणि बबनराव पाचपुते ) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
काँग्रेसमधील बदलांमुळे खीळ
गेली दहा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेकदा कुरबुरी झाल्या, पण यशस्वी तोडगा काढण्यात आला होता. सोनिया गांधी यांनी पवारांना फारसे दुखावले नाही. राहुल गांधी यांच्या मनात मात्र पवार यांच्याबद्दल तेवढी सहानुभूती नाही. त्यातच राहुल गांधी यांच्या धोरणांवर राष्ट्रवादीचे नेते टीकाटिप्पणी करतात. अगदी राहुल यांच्या मुलाखतीनंतर पटेल यांनी मोदी यांचेच समर्थन केले. सोनिया गांधी किंवा अहमद पटेल यांच्या धर्तीवर राहुल यांच्याशी चर्चा होत नाही, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.
चार नव्हे दोन दिवसांत निर्णय व्हावा – ठाकरे
जागावाटपाची चर्चा किंवा आघाडीबाबतचा निर्णय चार दिवसांत सुरू व्हावा, अन्यथा आम्हालाही वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. हा काही निर्वाणीचा इशारा नाही, पण काँग्रेसने आमच्या भूमिकेची दखल घ्यावी, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली. आघाडीची चर्चा चार दिवसांत काय दोन दिवसांतच पूर्ण व्हावी, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मांडली. जागावाटपाच्या चर्चेस आमची पूर्ण तयारी आहे. यानुसारच मुख्यमंत्री आणि पटेल यांच्यात भेटही झाली याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.