शिवाजी पार्कच्या नामकरणावरुन उठलेले वादळ शिवसेनेने माघार घेताच शमले होते. मात्र शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारांवर नामफलक लावण्याची मागणी करुन काँग्रेसने नव्याने वाद उकरून काढला आहे. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
शिवाजी पार्कचे नाव ‘शिवतिर्थ’ करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली होती. तसेच त्याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मांडण्यात आल्याने राजकीय वादंग सुरू झाला होता. मात्र ‘मातोश्री’च्या आदेशामुळे राहुल शेवाळे पालिका सभागृहात अनुपस्थित राहिले आणि शिवसेनेकडून मांडण्यात आलेला ठराव रखडला. शिवाजी पार्कच्या नामकरणावरुन राजकारण तापू लागताच शिवसेनेने माघार घेतली आणि अखेर या वादावर पडता पडला.
पारतंत्र्यकाळात शिवाजी पार्कचे नाव माहीम पार्क असे होते. त्याचे शिवाजी पार्क असे नामकरण करण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविकेने पुढाकार घेतला होता. काँग्रेसच्या मागणीमुळे नामकरण करण्यात आलेल्या शिवाजी पार्कचे नाव आता बदलण्यात येऊ नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने शिवाजी पार्कच्या प्रत्येक प्रवेशद्वारांवर नामफलक बसविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी याबाबतचे एक पत्र पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे सादर केले आहे. त्यामुळे शिवसेना आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा