मधु कांबळे, लोकसत्ता
मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाटयाला आलेल्या १७ पैकी १५ लोकसभा मतदारसंघांत थेट भाजपशी लढाई होत आहे, तर उर्वरित दोन मतदारसंघांत शिवसेना शिंदे गटाशी सामना आहे. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात कुठेही लढत नाही. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. सांगली व हातकणंगले या दोन मतदारसंघांचा अपवाद आहे. या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २१ जागा लढवीत आहे. काँग्रेसच्या वाटयाला १७ मतदारसंघ आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) १० जागा सोडण्यात आल्या आहेत.
भाजपच्या २८ पैकी १५ जागेवर काँग्रेसची लढाई आहे. उर्वरित १३ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, अकोला, या सहा मतदारसंघांत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई झाली. मराठवाडयातील तीनपैकी नांदेड या मतदारसंघात भाजप व काँग्रेस सामना झाला.
हेही वाचा >>> सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर; डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट
उर्वरित टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर, जालना, धुळे, नंदुरबार या मतदारसंघांत भाजप व काँग्रेस यांच्यात थेट सामना आहे. रामटेक व कोल्हापूर या दोन मतदारसंघांत काँग्रेसची शिवसेना शिंदे गटाशी लढत आहे. त्यापैकी रामटेकमध्ये मतदान पार पडले आहे. भाजपने २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरच्या युतीत २५ जागा लढवून २३ जागा जिंकल्या होत्या. त्या मधील काँग्रेस आता लढत असलेल्या १५ पैकी १३ मतदारसंघांत भाजपने विजय मिळविला होता. चंद्रपूरची जागा काँग्रेसने जिंकली होती. तर अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष नवनीत राणा निवडून आल्या होत्या. राणा आता भाजपच्या उमेदवार आहेत.