राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जनतेत जाण्याचं जाहीर केलं. यानंतर अजित पवार गटात आणि शरद पवार गटात जोरदार शाब्दिक युद्ध झालं. मात्र, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पक्षात फूट झाली नसल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (२५ ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. कदाचित त्यांना पक्षाची काळजी असेल. निवडणूक आयोग आणि न्यायालयात प्रकरण सुरू असताना मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षात फूट नाही, असं सांगणं त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. मात्र, आम्ही त्यात खोल जाण्याचा संबंधच येत नाही.”
“सुप्रिया सुळे-शरद पवार भाजपाबरोबर जाण्याच्या मार्गावर आहेत का?”
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाबरोबर जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली तरी सुप्रिया सुळे आणि शरद पवार पक्षात फुट पडलेली नसल्याचं म्हणत आहेत. यावरून तेही भाजपाबरोबर जाण्याच्या मार्गावर आहेत का? असा प्रश्न वडेट्टीवारांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहे. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते आहे. पैशाच्या भरवशावर लोकांना विकत घेऊ असं वाटत असेल, पण जनता यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात ते दिसेल.”
हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळेंशी संबंधित ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार संतापले, म्हणाले, “तुम्ही अक्कल…”
“आज स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत”
“आम्हाला धोका वाटण्याचं काही कारण नाही. आमच्याबरोबर शरद पवारांप्रमाणे अनेक आघाड्या आहेत. या सगळ्याचं उत्तर एकच आहे की, निवडणुकांची घोषणा होईल, आघाडीत वाटप होईल आणि त्यावेळी जे ठरेल ते त्यावेळची परिस्थिती असेल. आज स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत. अनेकांना विचारांचं, लोकांच्या मताचं काही देणंघेणं राहिलेलं नाही. लोकांना गृहित धरून राज्य खड्ड्यात घालण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत चित्र स्पष्ट झालेलं दिसेल,” असं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं.