डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलची संपूर्ण जमीन देण्याचे खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केले असताना व त्याची पूर्तता करण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिले असताना त्याचे श्रेय कुणी घ्यायचे यावरुन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्यात वाद सुरु झाला आहे. नामांतरासारखा आंबेडकर स्मारकाच्या योजनेचाही विचका करु नये, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी आठवले यांना दिला आहे.  गेल्या वर्षी ६ डिसेंबरला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन मिळावी यासाठी उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळेच राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर आंबेडकर स्मारकाला जमीन देण्याची चक्रे फिरू लागली. खुद्द पंतप्रधानांनी इंदू मिलची संपूर्ण जमीन स्मारकासाठी देण्याचे मान्य केले आहे. त्यासंबंधीची पुढील कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार जमिनीवरील आरक्षण बदलणे व हस्तांतर प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, लवकरच जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत आठवले व आनंदराज आंबेडकर यांना सांगितले. त्यानंतरही ५ डिसेंबर पर्यंत जमिनीचा निर्णय झाला नाही तर आरपीआयचे कार्यकर्ते मिलमध्ये घुसततील असा इशारा आठवले यांनी दिला आहे.
रिपब्लिकन सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित केलेल्या मेळाव्यात आनंदराज यांनी आठवले यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. सहा डिसेंबरला मिलचा ताबा घेतला आहे, त्या जागेवर आता बाबासाहेबांच्या स्मारकाशिवाय काहीही होऊ शकणार नाही, असे असताना ऊठसूठ शंभर-दोनशे लोक घ्यायचे आणि आंदोलन करायचे, आठवले यांचा हा सारा राजकीय श्रेय घेण्यासाठी अटापिटा सुरु आहे, असा टोला त्यांनी हाणला. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा याही प्रश्नाचा विचका करु नका असा इशाराही त्यांनी आठवले यांना दिला. या वेळी अ‍ॅड. संघराज रुपवते, विवेक मोरे, रमेश जाधव, आदी वक्तयांनीही आठवले यांनी स्वतच्या फायद्यासाठी आंबेडकरी चळवळीचा बाजार मांडल्याची टीका केली.