यूपीएमधील अनेक छोटे-मोठे भागीदार गेल्या नऊ वर्षांंमध्ये सोडून गेले, पण राष्ट्रवादीने अखेपर्यंत काँग्रेसची साथ कायम ठेवली. विश्वासू सहकारी म्हणून आगामी निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसकडून राष्ट्रवादीचा योग्य मानसन्मान ठेवला जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात २६-२२ जागावाटप हे अंतिम असल्याचा  निर्वाळा शनिवारी दिला.
मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नसल्याचे स्पष्ट केले. जागावाटपाबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली आहे. त्यात गेल्या वेळचे जागांचे संख्याबळ कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शरद पवार किंवा प्रफुल्ल पटेल हे जागावाटप निश्चित झाले, असा दावा करीत असले तरी ठाकरे हे पक्षाच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही, यावर ठाम आहेत.
जागांचे संख्याबळ निश्चित झाले असले तरी काही जागांची आदलाबदल होऊ शकते, असे पटेल यांनी सांगितले. काही जागांमध्ये आदलाबदल व्हावी, अशी दोन्ही बाजूची इच्छा आहे. येत्या महिनाभरात जागावाटपाचा प्रश्न सोडविला जाईल. जागावाटपाची प्रक्रिया आधीच पूर्ण झाल्यास उभय बाजूने घोळ होणार नाही व निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आतापासूनच तयारी करता येईल, असे मत पटेल यांनी मांडले. गेल्या वेळी लढलेल्या २२ पैकी आठ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. १८ जागा लढविण्यावर राष्ट्रवादी ठाम असून चार जागांबाबत विचार करता येईल, असे पटेल यांनी सूचित केले. कोणत्या जागांची आदलाबदल होऊ शकते याबाबत काही सांगण्यास त्यांनी नकार दिला. दोन्ही बाजूने याबद्दल चर्चा केली जाणार आहे.