निवडणुकींना अद्याप काही कालावधी असला तरी काँग्रेसने राज्यात निवडणुकीचे रणिशग फुंकले आहे. सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असतानाच तुमच्या पक्षाचा आणि काँग्रेसचा कारभार याचा फरक जनतेला चांगलाच कळला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या मर्मावरच बोट ठेवले. तुम्ही तुमचा पक्ष वाढवा आणि आम्ही आमचा पक्ष वाढवू, असा प्रेमळ सल्लाही राष्ट्रवादीला देण्यात आला.
काँग्रेसच्या १२७ व्या वर्धापनदिनानिमित्त सायनच्या सोमय्या मैदानात वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात शरद पवार आणि अजित पवार यांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. परिणामी काँग्रेसने साहजिकच लगेचच राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर टीकाटिप्पणी करण्याचे टाळले असले तरी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मात्र राष्ट्रवादीवर हल्लाच चढविला.  आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना २३ पैकी केवळ ८ जागांवर विजय मिळविता आला होता. याउलट काँग्रेसने २५ जागा लढविल्या आणि त्यापैकी १७ जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. मात्र त्यानंतरही काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, असेही माणिकराव यांनी सुनावले.  शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाशिवाय अन्य कोणाचेही स्मारक होऊ नये, असे सांगत शिवाजी पार्कचे नामांतर  तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास तीव्र विरोध दर्शविला.
जो समाज आपला इतिहास विसरतो त्याला भविष्य राहत नाही़  त्यामुळेच  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भव्य स्मारके उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून काँग्रेसचा जाहीरनामा आणि पक्षाचा विचार समोर ठेवून आपण कारभार करीत असल्याचे या वेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. सिंचन धोरणात बदल करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेणारच हे सांगत त्यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. यावेळी केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, उद्योग मंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांचीही भाषणे झाली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा