मुंबई : संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती असूनही मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी राजशिष्टाचार सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली. सरपंच हत्येमध्ये वाल्मीक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत, पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी सभागृहात करू असे नाना पटोले म्हणाले.
सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकरने अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला त्यावर सरकारकडून काहीच बोलले जात नाही. महाराजांचा अपमान करणारे काही जण मंत्रिमंडळातही आहेत. जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल तर त्याचे समर्थन कसे करता, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.