मुंबई : अदानी उद्योग समुहाच्या घोटाळय़ातील सत्य बाहेर येण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीली ) हेच प्रभावी अस्त्र आहे, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. शरद पवार हे स्वत: एका संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष होते, समितीच्या अहवालाचा योग्य तो परिणाम झाला होता, याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यामुळे अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कुणी गुंतविले, हे सत्य बाहेर आण्यासाठी जेपीसी हवीच अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
अदानी उद्योग समुहाच्या घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी जेपीसीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती उपयुक्त व प्रभावी ठरेल, अशी शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर राजकीय वादंग सुरु झाले आहे. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. या मुद्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका करीत, काँग्रेस पक्ष जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
चव्हाण म्हणाले की, अदानी उद्योग समुहाने देशात टाळेबंदी असताना घोळ करून समभागांच्या (शेअर्स) किंमती कृत्रिमरित्या वाढवून लोकांना फसवले हे हिंडनबर्ग अहवालाने जगासमोर आणले. हिंडनबर्गच्या अहवालाला अदानी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु शकले नाही. राहुल गांधींनी मोदी-अदानींचे सत्य जगासमोर आणले. त्यांचा आवाज बंद करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून त्यांचे सदस्यत्व रद्द केले. अदानींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये आले कुठून, जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, अशी समिती स्थापन झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. २००३ मध्ये शीतपेयांमधील कीटकनाशकांचे अंश सापडले होते, त्याची चौकशी करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखासी जेपीसीची स्थापना झाली होती. त्या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत, याची आठवण करुन देते, जेपीसीचे महत्त्व त्यांनी विशद केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळय़ासंदर्भात मोदी- अदानी संबंध काय असा प्रश्न विचारताच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली. हा प्रश्न एकटय़ा राहुल गांधी यांचा नाही तर सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा प्रश्न आहे. देशातील आजची परिस्थिती पाहता भाजप सरकारने लोकशाहीचा खून केला आहे.
लवकरच अयोध्या दौरा – पटोले
ठाणे : अयोध्येतील महंतानी आम्हालाही निमंत्रण दिले असून आम्हीही अयोध्येत दर्शनाला जाणार आहोत असे प्रतिपादन काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तसेच सरकारच्या कारभाराने राज्याने मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाणे येथील गडकरी रंगायतन नाटय़गृहामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुथ्वीराज चव्हाण तसेच बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. ठाणे महापालिका क्षेत्रात रंगरंगोटीच्या कामावर ४५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. हे काम केवळ ५० ते ६० कोटी रुपयांचे आहे. तरीही त्यावर इतका खर्च करण्यात येत आहे. तसेच जी-२० परिषदेच्या खर्चाचा हिशोब घेण्यात येणार नाही. त्यामुळे त्यावर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. महागाई वाढली आहे.