अंधश्रद्धेच्या विरोधात सारे राजकारणी एका सुरात बोलत असतात. काँग्रेस आघाडी सरकारने तर, महाराष्ट्रातून बुवाबाजी आणि अंधश्रद्धा हद्दपार करण्यासाठी कायदाच केला. पण बुवाबाजी, ज्योतिष, भविष्याचा राजकारणावरच सर्वात अधिक पगडा असतो. अनेक नेत्यांचे आणि राजकारण्यांचे पान पंचाग पाहिल्याशिवाय हलत नाही. आता वास्तुशास्त्र हा नवा प्रकारही राजकारणात ठाण मांडू लागला आहे. पदभार कधी आणि कोणत्या वेळी स्वीकारायचा याचा मुहुर्त काढला जातो, तसाच, दालनाची रचना कशी असावी, प्रवेशद्वाराची दिशा कोणती असावी यासाठी वास्तुशास्त्रज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. मागे एका मंत्र्याच्या दालनात ठिकठिकाणी वास्तुशास्त्राच्या सल्ल्यानुसार बाहुल्यासदृश्य वस्तू लटकविण्यात आल्या होत्या. सध्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चढाओढ लागली आहे. विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मिळाले असले तरी राष्ट्रवादीचा या पदावरील दावा कायम आहे. यातूनच बहुधा विरोधी पक्षनेतेपदाच्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी विखे-पाटील यांनी वास्तुशास्त्रज्ञाचा सल्ला घेतला. त्याने बसण्याची जागा बदला, आणि खुर्चीची दिशा बदला, असा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार विखे-पाटील यांनी दालनातील बसण्याची व्यवस्था बदलून घेतली. पदाभोवतीच्या राजकीय पीडा आता दूर होतील, असा विश्वास विखे यांच्या दालनात दरवळत आहे..

Story img Loader