मुंबई : कृत्रिम बुध्दिमत्तेचे (एआय) प्रस्थ वाढत असतानाच्या आजच्या काळात जन्माला आलेल्या मुलांनी आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता ही वैशिष्ठ्ये कायम जपली पाहिजेत. कोणत्याही तांत्रिक साधनांना किंवा ॲपला भावना नसतात. त्यामुळे सृजनाचा अनुभव ते घेऊ शकत नाहीत, त्याची अभिव्यक्ती करू शकत नाहीत. उलट माणूस कलेच्या माध्यमातून हरएक पध्दतीने व्यक्त होऊ शकतो, नवे काही निर्माण करू शकतो. म्हणून एआयचा वापर हा आपल्या सोयीपुरती मर्यादित ठेवावा. त्याची सवय करून घेऊ नये, असा सल्ला ‘टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या दिवशी पार पडलेल्या ‘हूज लाईन इज इट एनीवे?’ या चर्चासत्रात बोलताना काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आम्हालाही मुंबई महानगरपालिका मुख्यालयात कार्यालय द्या, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

‘टाटा लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष चर्चासत्रांच्या आयोजनाला सुरूवात झाली. एनसीपीए येथे रंगलेल्या या फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी ‘हाऊ एआय इज इम्पॅक्टिंग द क्रिएटिव्ह प्रोसेस’ या विषयावरचे चर्चासत्र रंगले. या चर्चेत डॉ. शशी थरुर यांच्यासह गणिततज्ञ्ज डॉ. मार्कस डु सौटोय सहभागी झाले होते. तर परवेझ दिवाण यांनी या चर्चासत्रात सूत्रधाराची भूमिका बजावली. ‘एआय टूल वापरताना काही मर्यादा असतात, पण मानवी मेंदू हा या मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम करतो हे लक्षात ठेवले पाहिजे. एआय टूल अद्याप प्रगत झालेले नाही, तोवर मानवाची सृजनशीलता सुरक्षित आहे’, असे मत मार्कस यांनी मांडले.

‘टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हल’मधील ‘फॉर द लव्ह ऑफ द वर्ड’ या चर्चासत्रात शशी थरूर यांच्या ‘इन प्रेज ऑफ द फ्रेझ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ब्रिटिश पत्रकार मेहदी हसन उपस्थित होते. या वेळी शशी थरूर यांनी नवोदित लेखकांना सतत वाचत राहण्याचे आणि नविन गोष्टी आत्मसात करण्याचे आवाहन केले. ‘बिलिव्ह इट ऑर नॉट’ या आरोग्य विषयावरचे चर्चासत्रही यावेळी पार पडले. ‘निसर्ग हा आपल्या शरीराच्या तुलनेत अधिक वेगाने बदलतो आहे. त्या वेगाच्या अनुषंगाने गोष्टी आत्मसात करण्यात आपण मागे पडत असल्यानेच आपल्याला अनेक जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. अशावेळी बदलत्या जगात योगा आणि ध्यान करण्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते म्हणून योग करायला हवा’, असे आग्रही मत मार्गदर्शक डॉ. करण राजन यांनी या चर्चासत्रात आपले विचार मांडताना व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader shashi tharoor in tata literature live festival mumbai print news zws