काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं एक वाक्य सध्या चर्चेत आहे. वडेट्टीवारांनी मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक आहे, असं वक्तव्य केलं. तसेच शिवसैनिक असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मातोश्रीवर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “ही माझी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरची पहिली भेट नाही. यापूर्वीही माझी आणि त्यांची भेट झालेली आहे. विरोधी पक्षनेता झाल्यावर मातोश्रीवरील ही पहिली भेट आहे. मी सदिच्छा भेट म्हणून येथे आलो. अशा भेटीत अनेक विषयांवर चर्चा होत असते. आजच्या भेटीला फार राजकीय स्वरुप नव्हतं.”

हेही वाचा : VIDEO:”आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमतरता नाही, पण खरे जुने…”; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

“मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक आहे”

“बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून जुन्या आठवणी, किस्से यावर बरीच चर्चा झाली. कारण मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक आहे. त्यावेळी मी मातोश्रीवर अनेकदा आलो होतो. कोकणापासून गडचिरोलीपर्यंत, १९९० मध्ये झालेल्या निवडणुका, १९९५ मध्ये झालेल्या निवडणुका, १९९० मध्ये झालेली युती, त्यावेळची भाजपाची स्थिती यावरही चर्चा झाली,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “नितीन गडकरींना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाने….”, काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप

“त्यावेळी राज्यात भाजपाच्या लोकांना बसायला खुर्चीही देत नव्हते”

“पहिल्यांदा युती झाली त्यावेळी राज्यात भाजपाच्या लोकांना बसायला खुर्चीही देत नव्हते. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई की त्यांना बसायला खुर्ची मिळायला लागली. अशी सर्व चर्चा मातोश्रीवरील भेटीत झाली,” असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader vijay wadettiwar say i was a shivsena worker pbs