मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात यशस्वी करण्यावर सर्व नेत्यांनी भर दिला असून ही पदयात्रा इतिहास निर्माण करेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून राज्यात पक्षाचा राजकीय फायदा व्हावा अशी अपेक्षा नेतेमंडळींनी व्यक्त केली. राज्यातील पदयात्रेला ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याच्या तयारीसाठी टिळक भवन मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राजस्थानचे नेते सचिन पायलट, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, विधिमंडळ नेते आणि यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात आदी या वेळी उपस्थित होते.
राज्यात नांदेड आणि शेगाव येथे दोन जाहीर सभा होणार आहेत. नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांतून ही यात्रा मध्य प्रदेशात रवाना होईल. ७ ते २० नोव्हेंबर या काळात १४ दिवस ही यात्रा राज्यात असेल. या यात्रेच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्यावर पक्षाने भर दिला आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. पण या यात्रेतून काँग्रेसला फायदा व्हावा, अशी अपेक्षा नेतेमंडळींनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.
हेही वाचा >>> आमदारांना १०० कोटीत विकत घेण्याचा प्रयत्न, CM के चंद्रशेखर राव यांनी सोडलं मौन, मोदींचा उल्लेख करत म्हणाले “दिल्लीतले दलाल…”
केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या पाच राज्यांतून आतापर्यंत ५३ दिवस ही पदयात्रा सुरू आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला या पदयात्रेचा प्रवेश होत असून महाराष्ट्र राज्यातूनही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळून ही पदयात्रा इतिहास निर्माण करेल, असा विश्वास पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला आहे.
मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, त्यामुळे तरुण वर्गात प्रचंड नाराजी आहे, तर महागाईमुळे महिला व सामान्य जनतेत तीव्र संताप दिसत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सीबीआय, ईडी, आयकरसह सर्व स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. निवडणूक आयोग व न्यायपालिकाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे चित्र आहे. देशातील सद्य परिस्थितीचे प्रतििबब भारत जोडो यात्रेत उमटत आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…”
यात्रींसाठी मराठवाडी-खान्देशी भोजन
नांदेड : ‘भारत जोडो’ यात्रेत दक्षिणेतील पावणेदोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासात भात आणि तांदळाच्या विविध पदार्थाची चव चाखल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतयात्री आणि अन्य मान्यवरांचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर त्यांच्या भोजन व न्याहारीच्या व्यवस्थेत मराठवाडा आणि खान्देशातील पाककृतींवर भर ठेवण्यात येणार आहे. खास मराठवाडय़ातील दही-धपाटे, थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठलं याबरोबरच खान्देशातील शेवभाजी, वांग्याचे भरीत आदी पदार्थाचा त्यात समावेश आहे. भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून येथून ती हिंगोली जिल्ह्यात प्रस्थान करेपर्यंत भोजन व न्याहारीच्या व्यवस्थेचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे.