आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने मान्य केले असले तरी काँग्रेस नेत्यांच्या मनातील राष्ट्रवादीविरोधी भावना अद्यापही कमी झालेली नाही. त्यातूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर स्वार्थीपणाचा ठपका ठेवला.  
काँग्रेस- राष्ट्रवादीत २६-२२ जागांचे वाटप निश्चित झाले असून, आता राज्यात याबाबत चर्चा होणार नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसचा त्याला आक्षेप आहे. २००४ आणि २००९च्या निवडणुकांपूर्वी राज्यात आघाडीच्या जागावाटपांची चर्चा झाली होती. अंतिम स्वरूप तेव्हा दिल्लीत देण्यात आले होते. तेव्हा काँग्रेसच्या ताब्यातील काही जागा मिळाविण्यासाठीच ही चर्चा मुंबईत करण्यात आली.
२००४ मध्ये काँग्रेसने लोकसभेच्या सहा तर विधानसभेच्या १७ जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या होत्या. २००९ मध्येही राष्ट्रवादीच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. आता अधिकच्या जागा नको म्हणूनच राष्ट्रवादीला राज्य पातळीवर चर्चा नको का, असा सवाल ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. जागावाटपाचे सूत्र किंवा कोणी कोणती जागा लढवायची याचा निर्णय अद्याप झालेली नाही याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे ‘व्हिजन २०१४’
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने ‘व्हिजन २०१४’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या आश्वासनांची करण्यात आलेली पूर्तता, नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पुस्तिका आदी तयार करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात बुधवारी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने २१ सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत जनजागरण यात्रा राज्यभर काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वाशिम जिल्ह्यात होईल. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून जनजागरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress maharashtra president blame selfish to ncp