मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र उर्फ बाळा आंबेरकर यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस अंतर्गत गटबाजीला उधाण येऊ नये, याची काळजी घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी ज्ञानराज निकम यांचे स्थायी समितीमधील सदस्यपद कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. मात्र विरोधी पक्षनेते या नात्याने आंबेरकर यांचा स्थायी समितीतील मार्ग मोकळा व्हावा, यासाठी काँग्रेसच्या अन्य पाच सदस्यांपैकी एकावर कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेता हा स्थायी समितीचा सदस्य असतो. त्यानुसार आधीचे विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम स्थायी समितीचे सदस्य होते. त्यांच्या जागी काँग्रेसने देवेंद्र आंबेरकर यांची नियुक्ती झाली. ज्ञानराज निकम मुरली देवरा गटाचे, तर देवेंद्र आंबेरकर गुरुदास कामत गटाचे म्हणूनच परिचित आहेत. निकम यांची उचलबांगडी केल्यामुळे देवरा गट संतप्त झाला आहे. आता निकम यांना स्थायी समितीतूनही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला तर पक्षांतर्गत दुफळी माजेल ही भीती कामत गटाला वाटत आहे. त्यामुळे निकम यांना स्थायी समितीमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थायी समिती सदस्यांमध्ये निकम यांच्याव्यतिरिक्त सुनील मोरे, आसिफ झकेरिया, शीतल म्हात्रे, ज्योत्स्ना दिघे आणि प्रवीण छेडा या काँग्रेस नगरसेवकांचा समावेश आहे. आंबेरकर यांच्यासाठी या पाचपैकी एका सदस्याला राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र नेमका कोणाचा राजीनामा घ्यायचा यावर अद्यापही शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये आलेले प्रवीण छेडा, महापौरांना बांगडय़ा देण्याचे धारिष्टय़ दाखविणाऱ्या शीतल म्हात्रे, तसेच अनेक मुद्दय़ांवर आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांना निरुत्तर करणारे आसिफ झकेरिया यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाला धक्का बसण्याची शक्यता धूसर आहे. मात्र बैठकीत अभावानेच तोंड उघडणाऱ्या ज्योत्स्ना दिघे आणि सुनील मोरे यांच्यापैकी एकावर गंडातर येण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader