राज्यात १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम लागू करण्यात आले आहेत. करोनाचा सध्या कमी होऊ लागलेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी हा लॉकडाउन अधिक वाढवण्याचसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात आता मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. “जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात लसीकरण ५० टक्क्यांच्या वर जात नाही, तोपर्यंत लॉकडाउनमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही. तसं केल्यास ते करोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखं आहे”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. त्यामुळे १ जूनपासून लॉकडाऊन मागे घेतला जाणं कठीण वाटत असलं, तरी त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाण्याचे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या गोष्टींसाठी मुभा मिळणार?

दरम्यान, मुंबईसंदर्भात विचार करता लसीकरणाचा आकडा अजूनही कमी असल्यामुळे नियमांमधून कोणत्या गोष्टींना मुभा देण्यात येईल, याविषयी देखील अस्लम शेख यांनी संकेत दिले आहेत. “लॉकडाउनमघ्ये कोणते बदल करायचे, कोणती दुकानं उघडायची, एसीची दुकानं, सलून, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना निर्बंधांतून वगळता येईल का? अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी असणाऱ्या सेवांमध्ये अजून वाढ करता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोविड टास्क फोर्सकडून अभ्यास करून शिफारशी केल्या जातील. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकार जबाबदार!

यावेळी बोलताना अस्लम शेख यांनी तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. “तिसरी लाट येणारच. देशात जे लसीकरण व्हायला हवं होतं, ते झालेलं नाही. केंद्र सरकारचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबईतल्या नव्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये लहान मुलांसाठी विशेष वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत विशेषत: कोविड पेडियाट्रिकच्या डॉक्टरांचा देखील एक टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे”, अशी माहिती अस्लम शेख यांनी यावेळी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla aslam shaikh on lockdown restrictions in maharashtra to be lifted pmw