राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज ( १८ जुलै ) विधानसभेत नार्कोटिक्स विभागावर लक्षवेधी होती. या विषयावर अनेक आमदारांनी चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी खळबळजनक दावा केला आहे. बटण ड्रग्जची गोळी खाल्ल्यानंतर व्यक्तीने एकाचा खून केला. त्यानंतर खून करण्यात आलेल्या व्यक्तीचा पार्श्वभाग कापून खाण्यात आला, असं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं आहे.
कैलास गोरंट्याल म्हणाले की, “बटण ड्रग्ज गोळी ही भयंकर आहे. १० रुपयांना ही गोळी मिळते. तर, ५० रुपयांना व्यक्ती ती खरेदी करतो. एक गोळी खाल्ल्यानंतर व्यक्तीला काहीच कळत नाही. औरंगाबाद येथे दंगल घडण्यापूर्वी व्यक्तीने एकाचा खून केला होता. त्यानंतर खून करण्यात आलेल्या व्यक्तीचा पार्श्वभाग कापून शिजवत ते खाण्यात आला.”
“यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. पण, अद्याप पोलिसांकडून कोणताही कारवाई करण्यात आली नाही. जिथे बटन ड्रग्जची गोळी विकण्यात येते, तेथील पोलीस आयुक्त आणि जिल्हा अधीक्षक यांच्यावर कारवाई केली जावी. तरच, हे उद्योग बंद होतील,” अशी मागणी कैलास गोरंट्याल यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.