मुंबईतील वरळी परिसरात रविवारी भीषण अपघात घडला.एका आलिशान कारने दुचाकीवर मासळी घेऊन चाललेल्या वरळी कोळीवाड्यातील एका दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर बीएमडब्लू कार ही शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली. तसेच या गाडीमध्ये राजेश शाह यांचा मुलगा मिहीर होता, असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु असून राजेश शाह यांना अटक करण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिट अँड रन अपघाताची अनेक प्रकरणे घडल्याचं समोर आलं आहे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरून आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. या अपघातातील मुलाचे वडील सापडतात. मग मुलगा का सापडत नाही? , असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुलडोझर बाबा असे बॅनर लागले होते. आता बुलडोझर बाबा कुठे आहेत?, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा : Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
“वरळीच्या आसपास रात्री अडीच वाजता हा अपघात झाला आहे. शिवसेनेचे राजेश शाह आणि त्यांच्या मुलाकडून हा अपघात झाला. यामध्ये एका कोळी बांधवाच्या पत्नीचा मुत्यू झाला. ही घटना गंभीर आहे. या अपघातातील मुलगा अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही. याचा अर्थ असा आहे की राजेश शाह हे त्यांच्या मुलाला पाठीशी घालत आहेत. वडील सापडतात आणि मुलगा का सापडत नाही. हा मुलगा दारूच्या नशेत होता. या अपघाताच्या घटनेनंतर जर त्या मुलाला पोलीस ठाण्यात नेले असते आणि मेडीकल केले असते तर तो यामध्ये अडकेल यामुळे त्याला पाठीशी घातलं जात आहे.पण पोलिसांनी या अपघात प्रकरणातील आरोपीला अटक केली पाहिजे”, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.
“अपघातातील आरोपी रात्री अडीच वाजता एका पबमधून बाहेर आला. हा पब रात्री अडीच वाजता सुरु होता. याचा अर्थ महाराष्ट्रात अद्यापही नियमाच्या बाहेर पब चालू आहेत. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोर्ड लागले होते की, बुलडोझर बाबा. मात्र, ते चित्र हे खोटं आहे. वरळीत रात्री दोन वाजता पबमधून या अपघाताच्या घटनेतील मुलगा बाहेर पडतो. याचा अर्थ पब रात्री चालू आहेत. मग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधिकारी काय करतात? या महाराष्ट्रात काय चाललंय?”, असंही रवींद्र धंगेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, “या अपघातामधील कारवरील लोगो आणि नंबर प्लेट ज्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे त्यांनाही अटक झाली पाहिजे. आता मी वरळी पोलीस ठाण्यात जाणार असून या घटनेतील तो मुलगा का सापडत नाही? यासंदर्भात प्रश्न विचारणार आहे. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. या प्रकरणात तातडीने कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जर त्या मुलाला अटक केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आमची बाजू मांडणार आहोत”, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.