धारावी पुर्नविकास प्रकल्प अदाणी समूहाकडे देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्या आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी अदाणी समूह आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. “अदाणींना सर्वच आंदण देण्याचा सपाटा लावला गेला आहे. अदाणींनी विमानतळ घेतले, पोर्ट घेतले, बँका घेतल्या. आता धारावी घेणार का? अदाणींनी मुंबईसाठी काय केले? पण धारावी तुमच्या हाती लागणार नाही. मोदाणींना धारावीचे लचके तोडू देणार नाही. धारावी एकट्याने लढणारी आहे. धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येऊन लढतील”, अशी भूमिका आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडली. मोदी आणि अदाणी यांचे नाव एकत्र करून मोदाणी असे करून काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपल्या मोर्चाची टॅगलाईन बनविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> विश्लेषण : तब्बल १९ वर्षांनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार?

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, “काही लोकांना (भाजपा) वाटतं आपल्या मित्राला (अदाणी) मदत केली पाहीजे. म्हणून रोज नवीन नवीन गोष्टी आणल्या जात आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आज राज्य आणि केंद्र सरकारचे कान आणि डोळे उघडले असतील. जनता काय बोलू इच्छिते हे आजच्या मोर्चातून त्यांना कळले असेल. धारावीचे धारावीपण टिकले पाहीजे. धारावी बीकेसीचे विस्तारीकरण होता कामा नये. धारावीकरांना धारावीतच घर मिळाले पाहीजे.”

“धारावी बनविण्याचे काम धारावीतल्या जनतेने केलेले आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन धारवी बनलेली आहे. ज्याला आम्ही मिनी इंडिया म्हणतो. धारावीची ओळखच मुळात बिगेस्ट मायक्रो फायनान्स कॅपिटल म्हणून आहे. लेदर, गारमेंट, रिसायकलींग असे अनेक लघु उद्योग धारावीच्या घराघरात चालतात. धारावीची ओळख केंद्र आणि राज्य सरकारने करून घेतली पाहीजे. आपल्या मित्राला फायदा व्हावा, म्हणून निविदा बदलली गेली आणि ती आपल्या मित्राला म्हणजेच अदाणी यांना देण्यात आली. आम्हालाही धारावीचा विकास हवा आहे, आम्ही विकासाच्या विरोधात नाहीत. पण आमची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी”, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.

आज दुपारी धारावी टी जंक्शनपासून मोर्चाला सुरूवात झाली. बीकेसी येथील सीएनजी पेट्रोल पंपापासून परिमंडळ ८ जवळ हा मोर्चा थांबला आणि त्याचे सभेत रुपांतर झाले. या सभेला उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी संबोधित केले. तसेच या मोर्चात खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते सहभागी झाले आहेत.

मोर्च्यातील मागण्या काय आहेत?

  • धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीत पुर्नवसन करा.
  • निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या. ‘टीडीआर’साठी सरकारनं स्वत:ची कंपनीची नेमणूक करावी.
  • पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत द्या.
  • धारावीचं नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करा.
  • प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी ‘मास्टर प्लान’ आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या.
  • शाहू लेबर कॅम्पमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचा घरे द्या.
  • अदाणी हा विश्वासार्ह विकासक नसल्याची जनभावना असल्यानं म्हाडा, सिडको, प्राधिकरणाकडून ‘बीडीडी’च्या धर्तीवर पुर्नविकास करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla varsha gaikwad slasm bjp government over dharavi redevelopment project give to adani kvg