महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच झालेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुद्दा आता तापू लागला आहे. या मुद्यावर एकीकडे काँग्रेस व मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच भाडेवाढीचा फटका निवडणुकीत बसण्याच्या भीतीने शिवसेना, रिपाइंसह आता भाजपनेही या दरवाढीला विरोध सुरू केला आहे.
         -अग्रलेख-
क्यूं की साँस भी कभी..
ऐन निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे तिकीट दरवाढीने काँग्रेसच्या हाती आयताच मुद्दा सापडला आहे. त्यामुळे आज, सोमवारी सकाळी १० वाजता काँग्रेसने मुंबईत ‘विनातिकीट’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदार या आंदोलनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह सीएसटी ते ठाणे असा विनातिकीट प्रवास करणार आहेत. दुसरीकडे, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांची ही फसवणूक असून मुंबईतील शिवसेना-भाजपचे सहाही खासदार आता गप्प का,’ असा सवाल मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी केला. यासंदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरवाढीचा महायुतीनेही धसका घेतला आहे. या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाली असतानाच भाजप नेत्यांनीही आता यासाठी धावाधाव सुरू केली आहे. यासंदर्भात आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी बोललो असून त्यांनी मोदी आणि रेल्वेमंत्री यांच्या कानावर हा विषय घालण्याचे जाहीर केल्याचे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले.
भाडेवाढीविरोधात जनहित याचिका
रेल्वे तिकीट दरवाढीनुसार मासिक पासाच्या दरात १०० ते १८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे एवढी वाढ धक्कादायक असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरिष देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे पंचायतीच्या वर्षां राऊत यांनी स्पष्ट केले .
रेल्वेचा पास कधी काढायचा?
२५ जूनआधी पास काढल्यास वाढीव दराने पास मिळणार की, पूर्वीचाच दर आकारला जाईल, तीन महिन्यांचा पास काढल्यानंतर पुढील दरांतील तफावत वळती करून घेणार का, या प्रश्नांची उत्तरे रेल्वेच्या तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यांकडेही नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे.

Story img Loader