भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू जयराम रमेश यांना कर्नाटकमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे निष्ठावान अजय माकन व रणदीप सुरजेवाला यांना अनुक्रमे हरियाणा व राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली. राज्यातील राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. नाराज झालेल्यांमध्ये नगमा यांचाही समावेश आहे.
नगमा यांची नाराजी
प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी आपली नाराजी जाहीर केली असून १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचं म्हटलं आहे. चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री नगमा यांनी २००४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना स्वतः सोनिया गांधी यांनी राज्यसभेचं वचन दिलं होतं. मात्र, १८ वर्षांनंतरही या वचनाची पुर्तता झाली नसल्याचं म्हणत नगमा यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने नगमा यांनी नाराज होत दोन ट्वीट केले. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं ट्वीट रिट्विट करत आपली १८ वर्षांची तपस्या इम्रान भाईंसमोर कमी पडल्याचं मत व्यक्त केलं. पवन खेरा यांनी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये कदाचित माझी तपस्या काहिशी कमी पडल्याचं ट्वीट केलं होतं.
“मी राज्यसभेसाठी पात्र नाही का?”
नगमा यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं, “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी २००३-०४ काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला १८ वर्षे झालेत मात्र त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर घेण्यात आलं. मी पात्र नाही का असा माझा सवाल आहे.”
आपलं मत मांडण्याचा सर्वांना अधिकार – नाना पटोले
नगमा आणि पवन खेरा यांनी आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचं सांगत नाराजी जाहीर केल्याबद्दल विचारलं असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “मी श्रेष्ठ आहे असं मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांनी मांडलं असेल. व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे”. इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“भाजपात उमेदवारी दिलेले आहेत आणि तिथेही कुरघोडी आहे. पण तिथे लोकशाही नाही, मत मांडण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे मांडलं असेल कारण त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. हा पक्षीय स्तरावरील प्रश्न नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
दिल्लीत काँग्रेसची बैठक होण्यासंबंधी आणि नाराजीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. हे सरकार झालं, त्याचं कारण सर्वांना माहिती आहे. सोनिया गांधींनी तेव्हा किमान समान कार्यक्रमाची भूमिका मांडली होती. त्याचा आढावा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. भूमिका पूर्ण झाली का हे तपासणार आहे. सरकारने त्याप्रमाणे काम करावं अशी अपेक्षा आहे”.