काँग्रेस, राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर आरोप
मुंबई : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांतील पूरस्थिती हातळण्यात शासकीय यंत्रणा पर्णपूणे अपयशी ठरली आहे, प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ११ निरपराधांचे बळी गेले, अशा शब्दात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. पूरपरिस्थिती राज्य प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे, ती सावरण्यासाठी तातडीने लष्कराला पाचारण करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यातील पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन आणि एनडीआरएफ बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे. तसेच केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून राज्याला चार हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी थोरात यांनी केली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांमधील लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत. परंतु मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. चार-पाच दिवस झाले पालकमंत्री तिकडे फिरकले नाहीत, फक्त ध्वजारोहण करण्यासाठीच त्यांना नेमले आहे का, असा सवाल त्यांनी केला.
सांगली जिल्ह्य़ातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाला. सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे ते बळी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. एक तर राज्य सरकारने पुरेशी उपाययोजना केली नाही. आवश्यक तेवढय़ा बोटी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या नाहीत. शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई केल्याने निरपराध नागरिकांचे बळी गेले, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील दहा जिल्ह्य़ात पूरपरिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात मग्न होते. मुंबईत येऊन मंत्रिमंडळ बैठक कशासाठी घेतली तर जमीन वाटपाचा निर्णय करण्यासाठी अशी टीका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.