राज्यातील सत्ता उपभोगताना एकमेकांचा उल्लेख ‘मित्रपक्ष’ असा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवी मुंबईत मात्र एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत. बढती प्रस्तावातील चर्चेदरम्यान झालेल्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐरोलीतील नगरसेविका विनया मनोहर मढवी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांना मारहाण केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे सभागृह पुन्हा एकदा वादाचा केंद्रिबदू ठरले आहे.
शहरातील कचरा सफाईच्या मुद्दयावर काँग्रेस नगरसेवकांनी मांडलेली लक्षवेधी सूचना सभेच्या सुरुवातीलाच महापौर सागर नाईक यांनी फेटाळून लावली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नगरसेवकांमध्ये खटके उडत होते. पालकमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक भरत नखाते यांनी नवी मुंबईतील वाढीव चटईक्षेत्राच्या मुद्दयावर थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेऊन टोमणे मारल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक अस्वस्थ होते.
या पाश्र्वभूमीवर सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांना उपायुक्तपदी बढती देण्याचा प्रस्तावावर चर्चा सुरु असताना नाईक यांचे कट्टर समर्थक एम.के.मढवी यांची गाडी अतिरीक्त आयुक्त डॉ.संजय पत्तीवार यांच्या पदोन्नतीच्या मुद्दयाकडे घसरली. डॉ.पत्तीवार यांना चुकीच्या पद्धतीने बढती देण्यात आली असून त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी करत मढवी यांनी तब्बल पाउणतास सभागृहात आरोपांच्या फैरी चालविल्या होत्या.
मढवी यांच्या लांबलेल्या भाषणामुळे महापौरही वैतागले होते. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी मढवी यांचा मुद्दा खोडून काढताना सुरेश पाटील यांच्या पद्दोन्नतीच्या विषयात डॉ.पत्तीवार यांचा विषय आणू नका, असा सल्ला त्यांना दिला. तरीही मढवी कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी मढवी यांचे भाषण थांबवावे, अशी मागणी महापौरांकडे केली.
मढवी विषय सोडून बोलत असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नगरसेवक संतोष शेट्टी आणि दशरथ भगत यांनी उपस्थित केला. त्यावर मढवी यांनी शेट्टी यांच्या बेकायदा बांधकामाचा उल्लेख केला. मढवी व्यक्तीगत पातळीवर टिका करत असल्याचे पाहून शेट्टी यांनीही अतिक्रमण घोटाळ्यात कुणाचे नाव होते हे विसरलात का, असा सवाल करत मढवी यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यामुळे संतापलेल्या मढवी यांच्या नगरसेविका पत्नी विनया मढवी यांनी शेट्टी यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांच्या पाठीत बुक्क्याचे प्रहार केले.