आगामी लोकसभा निवडणुकीत निधर्मवादी मतांचे विभाजन टाळण्याच्या उद्देशाने काँग्रेसने प्रकाश आंबेडकर आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांना बरोबर घेण्याची तयारी दर्शविली. तसेच राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा लगेचच सुरू करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली. प्रकाश आंबेडकर आणि कवाडे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने गेल्या वेळचे जागावाटपाचे सूत्र कायम ठेवण्याची घोषणा केली असली तरी काँग्रेसला हे सूत्र मान्य नाही. तरीही राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा लगेचच सुरू करावी, असा मतप्रवाह बैठकीत मांडण्यात आला. राष्ट्रवादीची भूमिका, विरोधकांचे आव्हान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह नारायण राणे, अशोक चव्हाण आदी नेते याप्रसंग उपस्थित होते.

Story img Loader