शरद पवार यांचे मत
मुंबई: आजच्या काँग्रेसची अवस्था ही जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार कोणा एके काळी हे शिवार सगळ हिरवेगार होते, असे सांगतो. तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची झाल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त के ले आहे.
‘इंडिया टुडे’चे मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
पवार म्हणाले, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.
प्रशांत किशोरची मला गरज नाही
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याबद्दलच पवार म्हणाले, मला प्रशांत किशोरची मदत घेण्याची गरज नाही. सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे पवारांनी स्पष्ट के ले.