बिहारच्या यशाच्या पाश्र्वभूमीवर चर्चेला उधाण
स्वबळावर सत्ता हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे उद्दिष्ट असले तरी बिहारमध्ये आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर लगेचच आसाममध्ये या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांबरोबर हातमिळवणी करण्यास नेतृत्वाकडून आडकाठी केली जाणार नाही, असेच स्पष्ट आहे. हाच कल राहिल्यास महाराष्ट्रातही राष्ट्रवादीबरोबर पुन्हा मैत्रीचा हात पुढे करण्यात काँग्रेसला अडचण येणार नाही.
काँग्रेसने १९९८ मध्ये झालेल्या पंचमढी शिबिरात आघाडीच्या प्रयोगाला मान्यता दिली होती. तेव्हापासून पक्षाचा भर आघाडी किंवा समविचारी पक्षांना बरोबर घेण्याकडे राहिला आहे. २००४ मध्ये काँग्रेसची सत्ता आली, पण निवडणुकीपूर्वी नवीन मित्र जोडण्याकरिता सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला होता.
शरद पवार, रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव आदी नेत्यांशी त्यांनी स्वत:हून चर्चा केली होती. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्या गेल्या होत्या. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचे प्रस्थ वाढले आणि त्यांनी स्वबळावर सत्ता हे उद्दिष्ट ठेवले.
यातून शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यासारखे जुने मित्र दुखावले गेले. राज्यात राष्ट्रवादीला फार किंमत देऊ नये, असे फर्मानच सोडण्यात आले होते. त्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी बदनाम कशी होईल यावर भर दिला होता. भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी सर्व समविचारी किंवा निधर्मवादी पक्षांना एकत्र आणल्यास फायदा होऊ शकतो, हे बिहारच्या निकालाने स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर आघाडी करण्यास राहुल यांनी मान्यता दिली होती. बिहारच्या निकालानंतर लगेचच आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांनी भाजपला रोखण्याकरिता अन्य पक्षांबरोबर चर्चा करण्याचे जाहीर केले.
लोकसभेत पार सफाया उडालेल्या आणि त्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पिछेहाट झाल्याने राहुल यांनाही आघाडीचे महत्त्व बहुधा पटलेले दिसते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय सत्तेचे गणित जमणे कठीण जाते. काँग्रेस विचारांची जवळपास ३५ ते ४० टक्के मतांचे दोन्ही काँग्रेससमध्ये विभाजन होते. गेल्या वर्षभरात नवी मुंबई, कोल्हापूर, भंडारा या ठिकाणी सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे.