सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याचे प्रयत्न
ठाणे महापालिकेतील राजकीय वर्तुळात सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे प्रयत्न सुरू केले असताना इतके दिवस आघाडीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी ‘यू टर्न’ घेत यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र स्थानिक नेत्यांना पाठविले आहे, अशी माहिती काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते रवींद्र फाटक यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
एकीकडे आघाडीतील या मनोमीलनाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे याचिकाकर्ते मनोज िशदे यांनी मात्र ‘मला हे पत्र मिळालेले नाही’, असे सांगत वेगळाच सूर लावला. त्यामुळे काँग्रेसमधील विसंवादाचे सूर स्पष्ट झाले आहेत.   
ठाणे महापालिकेतील सत्तेचा सोपान गाठण्यासाठी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी सुरुवातीला राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना हा निर्णय पटला नाही आणि त्यांनी या गटातून पक्षाने बाहेर पडावे, असे आदेश स्थानिक नेत्यांना दिले. माणिकरावांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या गटातून बाहेर पडण्यासाठी स्थानिक नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयात काँग्रेसची याचिका फेटाळण्यात आली. या आदेशाला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे मनोज िशदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून आघाडीतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा कायम असल्याचे चित्र इतके दिवस कायम होते.
दरम्यान, एकीकडे काँग्रेसकडून लोकशाही आघाडीत राहण्याविषयी सकारात्मक चित्र उभे केले जात असताना मनसेने मात्र आघाडीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दिला असला तरी ही याचिका म्हणजे राजकीय व्यूहरचनेचा एक भाग असल्याचा दावाही मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांनी केला आहे. तसेच तिन्ही पक्ष महापालिकेत एकत्र असून आमच्यात मतभेद नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Story img Loader