आघाडीबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली असली तरी पूर्वानुभव लक्षात घेऊन काँग्रेसने सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेतली असून, राष्ट्रवादीवर पूर्णपणे विसंबून राहायचे नाही, अशी व्यूहरचना ठेवली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवतानाच गेल्या वेळी लढलेल्या २२ मतदारसंघांवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले. आघाडीमध्ये जागावाटपात शेवटपर्यंत घोळ घातला जातो. पण या वेळी राष्ट्रवादीने २२ जागा लढणार असल्याचे जाहीर करूनच तयारी सुरू केल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये संशय बळावला. त्यातूनच गुरुवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील दिल्लीवासी नेत्यांनी राष्ट्रवादीबद्दल संशयकल्लोळ तयार केला. राष्ट्रवादीवर विसंबून राहू नका अन्यथा ऐनवेळी गडबड होईल, असा इशारा पक्षाच्या सरचिटणीसांकडून देण्यात आला.
काँग्रेसचे नवनियुक्त सरचिटणीस गुरुदास कामत हे राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांच्या विरोधातच आहेत. पण पक्षाचे दुसरे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनीही राष्ट्रवादीच्या विरोधात सूर लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जाते. राहुल गांधी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विरोध लक्षात घेता काँग्रेसचे नेते बोलू लागले आहेत का, असा संशय राष्ट्रवादीच्या गोटात आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गाविक, प्रतिक पाटील, प्रिया दत्त आणि मारोतराव कोवासे या खासदारांच्या विरोधात राष्ट्रवादीने उघडपणे काम केले होते, असा काँग्रेसचा आक्षेप आहे.
औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने एका अपक्षाला ताकद दिली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता  काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये मित्र पक्ष कोणती भूमिका घेईल याबाबत काँग्रेसमध्ये संशयाची भावना आहे. आघाडीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये विश्वासाची भावना राहणे आवश्यक असते, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे. तर आघाडीवरून काँग्रेस नेते संशयकल्लोळ व्यक्त करीत असल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आश्चर्य व्यक्त केले.
सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या चर्चेतून आघाडीचा निर्णय झाला असताना त्यावर मतप्रदर्शन करणे योग्य ठरणार नाही, असेही मत आव्हाड यांनी व्यक्त केले.
गुरुवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील दिल्लीवासी नेत्यांनी राष्ट्रवादीबद्दल संशयकल्लोळ तयार केला. राष्ट्रवादीवर विसंबून राहू नका अन्यथा ऐनवेळी गडबड होईल, असा इशारा पक्षाच्या सरचिटणीसांकडून देण्यात आला.