राज्य सरकारचा साडेतीन वर्षांचा कारभार संपल्यावर महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्या करण्याची आठवण काँग्रेसला झाली आहे. महामंडळांवरील नियुक्त्या झाल्यावरच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे.
महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्या लवकर कराव्यात, अशी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला तयारी दर्शविली असली तरी मंडळांवरील नियुक्त्यांसाठी सुचविण्यात आलेल्या काही नावांबाबत मुख्यमंत्र्यांचा आक्षेप असल्याचे समजते.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे गेल्याच वर्षी पाठविण्यात आली होती. नावांबाबत एकमत न झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरूनही पक्षात एकमत झालेले नाही. मुख्यमंत्र्यांची शिफारस केलेल्या नावाला प्रदेश काँग्रेसचा तर प्रांताध्यक्षांनी सुचविलेल्या नावाला मुख्यमंत्र्यांचा आक्षेप आहे. माजी मंत्री बी. ए. देसाई यांची कन्या सुशीबेन शहा यांच्या नावावर एकमत व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा अलीकडेच आढावा घेतला तेव्हा चर्चेत रखडलेल्या नियुक्त्यांचा विषय निघाला होता. महामंडळांवरील नियुक्त्या किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार हे सारे मुख्यमंत्र्यांच्या मनाप्रमाणे होणार असेल तरच होईल. अन्यथा भिजत घोंगडे कायम ठेवले जाईल, अशीही शक्यता व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री चव्हाण विरुद्ध प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील शीतयुद्धाचा फटका नियुक्त्यांना बसू शकतो.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला संधी ?
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात गेल्या वेळी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कमी झाले होते. यावरून बरीच ओरडही झाली होती. पवनकुमार बन्सल आणि अश्वनीकुमार या दोन मंत्र्यांचे राजीनामे तसेच द्रमुक आणि तृणमूलने पाठिंबा काढून घेतल्याने मंत्रिमंडळातील त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने मंत्रिमंडळात काही जागा रिक्त आहेत. यामुळे छोटासा विस्तार करण्याची काँग्रेसची योजना आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून मुंबईचे गुरुदास कामत आणि नागपूरचे विलास मुत्तेमवार या दोघांची नावे चर्चेत आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या नियुक्तीपूर्वी राहुल गांधी यांनी कामत यांच्याशी चर्चा केली होती. चांदूरकर यांच्या नियुक्तीनंतर मुंबई काँग्रेसमध्ये कामत यांचे समर्थक सक्रिय झाल्याचे मानले जाते. 

Story img Loader