मुंबई : अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेतील ३५५ खांबांखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बाॅलीवूड थीम पार्क उभारण्याचे काम सुरु आहे. मेट्रो प्रकल्पातील सुशोभिकरणाअंतर्गत ३०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प एमएमआरडीएकडून हाती घेण्यात आला आहे. पण आता या प्रकल्पाला काँग्रेसने विरोध केला आहे. हा प्रकल्प म्हणजे अवाजवी खर्च असून अशा पार्कची गरज नाही, या कामात पारदर्शकता नाही असे म्हणत या प्रकल्पाला विरोध दर्शविणारे पत्र नुकतेच काँग्रेसच्या असिफ झकेरिया यांनी एमएमआरडीएला पत्र पाठविले आहे.
बाॅलीवूड थीम पार्क ज्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहे, त्या आमदार अॅड आशिष शेलार यांनी मात्र काँग्रेसचे हे आरोप फेटाळून लावत प्रत्येक चांगल्या प्रकल्पांना विरोध करण्याची काँग्रेसची वृत्ती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अकरा लाख ४० हजार उमेदवारांनी दिली रेल्वे भरती परीक्षा, भारतीय रेल्वेची मेगा भरती
एमएमआरडीएकडून २३.६४३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. ही मार्गिका एस.व्ही रोडवरुन जात असून या परिसरात, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, निर्माते, गायक राहतात. तर वांद्रे किल्ला, बँन्ड स्टँडसह अन्य पर्यटनस्थळे आहेत. कलाकारांना पाहायलाही येथे अनेक जण येतात. एकूणच चित्रपटसृष्टी आणि वांद्रे पश्चिम परिसराचे हे नाते लक्षात घेता चित्रपट सृष्टीचा इतिहास एका वेगळ्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यासाठी शेलार यांनी बाॅलीवूड थीम पार्कची संकल्पना आणली. ही संकल्पना एमएमआरडीएने स्वीकारत मेट्रो २ ब मार्गिकेवरील ३५५ खांबांखाली बाॅलीवूड थीम पार्कच्या कामास सुरुवात केली आहे. सध्या हे काम वेगात सुरु आहे. असे असताना आता काँग्रेसने या प्रकल्पास विरोध केला आहे. हा प्रकल्प म्हणजे पैशांची उधळपट्टी आहे, या प्रकल्पाच्या कंत्राटात पारदर्शकता नाही, कंत्राटदाराची नियुक्ती करण्यातही घाई करण्यात आली आहे, हा करदात्यांच्या पैशांचा गैरवापर असल्याचा आरोप करत झकेरिया यांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. तसे पत्र नुकतेच एमएमआरडीएला पाठविले आहे. या प्रकल्पाऐवजी खांबांखाली वृक्षारोपणाच्या माध्यमातून सुशोभिकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा…Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात आजपासून ५ दिवस पाणी कपात
झकेरिया यांच्या पत्राबाबत एमएमआरडीएकडून अद्याप कोणताही भूमिका मांडण्यात आलेली नाही. दरम्यान याविषयी बाॅलीवूड थीम पार्कची संकल्पना मांडणाऱ्या शेलार यांना विचारले असता त्यांनी या प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार नसून कंत्राट पूर्णतः पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक चांगल्या प्रकल्पास काँग्रेसकडून विरोध होतोच, त्यानुसार या प्रकल्पासही ते विरोध करत आहेत. पण मला आशा आहे की एमएमआरडीए योग्य तो निर्णय घेत हा प्रकल्प पुढे नेईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.