पदवीधर व शिक्षक मतदार संघातील पाच जागांसाठी ३ फेब्रुवारीला मतदान
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. तर नाशिकमध्ये जावयाकरिता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुका पूर्वी राजकीय पक्षांकडून फारशा गांभीर्याने घेतल्या जात नसत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघांसाठी ३ तारखेला मतदान होणार आहे. यापैकी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गृह आणि नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील करतात. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे हे आमदार होते. औरंगाबाद शिक्षकमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे, तर कोकणात रामनाथ मोते आणि नागपूरमध्ये नागो गणार हे आमदार होते. या पाचही आमदारांची मुदत डिसेंबरमध्ये संपली. मतदार याद्या जाहीर करण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढविल्याने निवडणुकीला विलंब झाला.
नाशिकमध्ये चुरस
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे आणि भाजपचे प्रशांत पाटील यांच्यात लढत होणार आहे. डॉ. तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे, तर पाटील हे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे जावई आहेत. काँग्रेसमध्ये लाथाळ्या आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप केला होता. यातून विखे-पाटील हे थोरातांच्या मेव्हण्याला कितपत मदत करतील याबाबत साशंकता आहे. जावयाकरिता भामरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्यापुढे यंदा भाजपचे आव्हान असेल. कोकण शिक्षक मतदारसंघात दोनदा आमदारकी भूषविलेल्या रामनाथ मोते यांना संघ परिवारातील शिक्षक परिषदेने उमेदवारी नाकारली आहे. याऐवजी वेणुनाथ कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे मोते हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी त्यांनी अन्य पक्षांच्या नेत्यांकडे उमेदवारीबाबत चाचपणी केली होती. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपशी संबंधित मंडळींचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने भाजपची मंडळी ही जागा निवडून आणण्याकरिता सारी प्रतिष्ठा पणाला लावल्याशिवाय राहणार नाहीत.
गृह राज्यमंत्र्यांसाठी आव्हान
अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षणीय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. सुमारे दोन लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात अमरावती जिल्ह्य़ात सर्वाधिक मतदार आहेत. काँग्रेसने संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सरकारी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यावर खोडके हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमरावती जिल्ह्य़ात खोडके यांचे संघटन चांगले आहे. अमरावती विभागात भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर गटबाजी आहे. डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोपाळ शर्मा, आमदार धोत्रे आदींचा गट विरोधात आहे. डॉ. पाटील यांना अपशकून करण्याकरिता भाजपमधील मंडळी टपून बसली आहेत. डॉ. पाटील यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष घालावे लागणार आहे. या निवडणुकीत पराभव झाल्यास डॉ. पाटील यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येऊ शकते. मात्र सध्या विदर्भात भाजपची हवा आहे. याचा भाजपला फायदा होऊ शकतो.
सध्याची परिस्थिती
- अमरावती पदवीधर – भाजप
- नाशिक पदवीधर – काँग्रेस
- औरंगाबाद शिक्षक – राष्ट्रवादी
- कोकण शिक्षक – शिक्षक परिषद
- नागपूर – शिक्षक परिषद