केवळ मतांसाठी खेळी; काँग्रेस, राष्ट्रवादीची राज ठाकरेंवर टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्टुलावर उभे राहिले काय किंवा मोठी शिडी घेतली काय, त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची हंडी काही फोडता येणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. तसेच ज्यांच्या घरातील तरुण मुलाने या नेत्यांच्या उंच दहीहंडीत आपला जीव गमावला अथवा कायमचे अपंगत्व आले त्याची जाणीव हिंदू सणाच्या नावाखाली नौटंकी करणाऱ्या नेत्यांना येणार नाही.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आशीष शेलार हे सर्वप्रथम खालच्या थरात उभे राहून वरती आठ-दहा थरांचा भार पेलून दाखवतील का? तसेच दहाव्या थरावर स्वत:च्या घरातील नातेवाईकांना हंडी फोडण्यासाठी उभे करतील का, असा सवाल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केला आहे.
दहीहंडीची उंची ठरवणारे सर्वोच्च न्यायालय कोण असा सवाल करत, यापुढे काय स्टुलावर उभे राहून दहीहंडी फोडायची का, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. न्यायालय हिंदूंच्याच सणात नाक खुपसत असल्याचे सांगत उंचीचा मुद्दा मंडळांशी चर्चा करून सोडवला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली होती. राज यांच्या या भूमिकेचा खरपूस समाचार घेताना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांवर डोळा ठेवून राज यांना आता कंठ फुटला आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे.
मुळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी हुतूतू, कबड्डी, खो खो आदी मराठी खेळांना कधी प्रोत्साहन दिले. पालिकेत यांची सत्ता असतानाही यांनी मराठी खेळ राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे यासाठी कोणते विशेष प्रयत्न केल असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. दहीहंडी हा सर्वासाठीच उत्साहाने साजरा करण्याचा सण आहे. तथापि लाखो रुपये खर्चून डीजे वाजवणे, चित्रपट तारे-तारकांना लक्षावेधी रुपये देऊन स्टेजवर नाचवणे यात कसला आला धार्मिकपणा असा सवाल करत हा धागडधिंगा बंद करण्यासाठी राज यांनी कधी तोंड का उघडले नाही, असा सवाल नबाब मलिक यांनी केला.
मंडळांना पूर्वीच शहाणपण का आले नाही?
मराठी मतांच्या स्टुलावर उभे राहून पालिका निवडणुकीची हंडी फोडता येणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनीही मारला आहे. दहीहंडी हा सर्वासाठीच प्रिय आहे.गेल्या काही वर्षांत लाखो रुपयांच्या बक्षिसाच्या हंडींमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले आहे. या सर्वाची जबाबदारी घेऊन किती मंडळांनी अथवा राजकीय पक्षांनी कायमस्वरूपी त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी उचलली तसेच हंडीच्या उंचीवरील मर्यादा यापूर्वी मंडळांनी का निश्चित केली नाही, असा सवालही नबाब मलिक यांनी उपस्थित केला.