पूर्वी प्रत्येक पक्षात दमदार बोलणारे वक्ते, प्रवक्ते होते; पण आता अधोगती सुरू झाली असून बोलणाऱ्यांचा दर्जा घसरतोय. माणसाचे मोठेपण हे त्याच्या गुणातून दिसले पाहिजे. शिक्षण, प्रशिक्षण, आणि मार्गदर्शनामुळे माणसाला शिकता येते. सुदैवाने काँग्रेस पक्षात बोलताना वाहवत जाणारे नेते नाहीत, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता लगावला, तर उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असून पवार यांनी तीन वेळा माफी मागितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वेगळी माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी मुंबईत राज्यस्तरीय प्रवक्ता शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी राणे बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला अध्यक्षा कमलताई व्यवहारे, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, आमदार भाई जगताप आणि शिबिराचे मार्गदर्शक शरद कारखानीस उपस्थित होते.
प्रवक्ता हा पक्षाचा वकील असतो. तो तरबेज, हुशार, परिपक्व आणि त्याचा सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. त्याने पक्षाची आयडॉलॉजी जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केले. काँग्रेसनेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळला असून इतर सर्व पक्ष हे धर्माध असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामाच्या जीवावर हा पक्ष २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader