पहिले पंतप्रधान जवहारलाल नेहरू आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त मजकूर ‘काँग्रेस दर्शन’ या पक्षाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधील संजय निरुपम यांचे विरोधक आक्रमक झाले असून, या निमित्ताने निरुपम यांची विकेट काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांवरून अध्यक्ष निरुपम यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही मुंबई काँग्रेसमधील गुरुदास कामत, मिलिंद देवरा आदी नेत्यांचे गट आक्रमक झाले आहेत. रा. स्व. संघाची विचारधारा लादणाऱ्या निरुपम यांच्यावर कारवाईची मागणी माजी मंत्री नसिम खान यांनी केली आहे. खान हे देवरा गटाचे खास मानले जातात. निरुपम यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारी पत्रे मुंबई काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत धाडली आहेत. पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी या संदर्भात निरुपम यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावरून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात परतल्यावर निरुपम यांच्या विरोधातील मोहिम तीव्र केली जाईल, अशी चिन्हे आहेत. दरम्यान, वादग्रस्त लिखाण करणारे सुधीर जोशी कोण आहेत, त्यांचा पत्ता काय अशी विचारणा करीत मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जोशी यांच्या तोंडाला काळे फासण्याची तयारी काही कार्यकर्त्यांनी केली होती.

Story img Loader