राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचे राष्ट्रवादीने टाळले
नांदेड, यवतमाळ व सातारा-सांगली या काँग्रेसला विजयाची अपेक्षा असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्याचे उद्दिष्ट विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ठेवले आहे. आघाडीत बिघाडी झाल्यावर दरवेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून दिल्लीत शब्द टाकला जातो, पण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचेही राष्ट्रवादीने यंदा टाळले आहे.
कोणत्याही निवडणुकीत आघाडीत जागावाटपाचा घोळ झाल्यावर राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल्ल पटेल हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी वा अहमद पटेल यांच्याशी चर्चा करीत असत. दिल्लीतून राष्ट्रवादीच्या कलाने घेतले जात असे. अगदी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतही राष्ट्रवादीने सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. या वेळी विधान परिषद निवडणुकीत राहुल गांधी यांनी लक्ष घातल्याने राष्ट्रवादीची पंचाईत झाली. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणे किंवा त्यांना मध्यस्थीसाठी विनंती करण्यात काहीच अडचण येत नसे. राहुल गांधी हे चर्चेलाही तयार नसतात, असा अनुभव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आला आहे. यामुळेच राहुल यांच्याशी चर्चा करण्याचे राष्ट्रवादीने टाळले.
काँग्रेसची कोंडी
नांदेडची जागा काँग्रेसकडे असून या मतदारसंघात काँग्रेसला विजयाची संधी आहे. या मतदारसंघात शिवसेना, भाजपने पाठिंबा दिलेले निवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात अपशकून करण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप बजोरिया यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी पुरेशी मते नसल्याने माघार घेतली जाईल, अशी चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादी चार जागांवर लढणार असून, नांदेड व यवतमाळमध्ये अपक्षांना पाठिंबा देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. यवतमाळमध्येही काँग्रेसला विजयाची संधी मिळू नये म्हणून राष्ट्रवादीची मते शिवसेनेच्या उमेदवाराच्या पारडय़ात टाकली जातील, अशी चिन्हे आहेत. सातारा-सांगली या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे तेवढय़ाच ‘ताकदी’ने रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादीने जोर लावला आहे. भाजप वा शिवसेनेची मदत या मतदारसंघात व्हावी, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहील. राष्ट्रवादीला पुणे, सातारा-सांगली या मतदारसंघात काँग्रेसच्या मदतीची गरज नाही. यामुळेच राष्ट्रवादीने आघाडीकरिता काँग्रेसकडे फार तगादा लावला नाही, असे समजते.
आघाडीची आमची तयारी होती, पण तीन जागांची काँग्रेसची मागणी मान्य करणे शक्यच नव्हते. जातीयवादी पक्षांचा फायदा होऊ नये म्हणून निधर्मवादी पक्षांची एकी आवश्यक आहे, पण काँग्रेसची भूमिका काही तरी वेगळी दिसते. – नवाब मलिक, प्रवक्ते , राष्ट्रवादी काँग्रेस