नगरपालिका निवडणुकांचा कौल लक्षात घेता आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली असली तरी, काँग्रेसने मात्र स्थानिक पातळीवर शक्य आहे तेथेच निर्णय होतील, अशी भूमिका घेत सर्वत्र राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचे टाळले आहे, तर मुंबईत आघाडीचा प्रश्नच येत नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढूनही उभयतांची निवडून आलेल्या सदस्यांची बेरीज केल्यास भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित संख्येच्या जवळपास आहे. यातूनच आगामी निवडणुकांमध्ये आघाडी व्हावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्याची आमची तयारी आहे, पण सारे काँग्रेसवर अवलंबून असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.  काँग्रेसने यावर सावध पवित्रा घेतला आहे. स्थानिक पातळीवर आघाडी करण्याकरिता प्रस्ताव आल्यास त्याचा विचार केला जाईल. स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.  राष्ट्रवादीने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी केली आहे. पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.  नगरपालिका निवडणुकांचा कौल लक्षात घेता राज्यातील जनता काँग्रेसबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

  • मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी केली जाणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. यावरून राष्ट्रवादीला आघाडीची आवश्यकता वाटत नाही. मुंबईतील पक्षांच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेनंतर आघाडी करायची नाही यावर एकमत झाल्याकडे निरुपम यांनी लक्ष वेधले.
  • काँग्रेसचा एकूण सूर लक्षात घेऊन आम्ही आधीपासूनच तयारी केल्याचे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांचे म्हणणे आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party vs ncp in bmc election