लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने तब्बल २२६ कोटी रुपये खर्च करून मुंबईमधील नाल्यांची सफाई केल्याचा आणि नाल्यांतून नऊ लाख मेट्रिक टन कचरा काढल्याचा दावा केला आहे. मात्र आजही मुंबईत अनेक नाल्यांमध्ये कचरा साचला असून महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफात घोटाळा झाला असून याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, अभियंते आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे.
संजय निरुपम यांनी शनिवारी गोरेगाव परिसरातील काही नाल्याची पाहणी केली. या नाल्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर नाले तुंबून नागरिकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा… डॉ. लहानेविरोधातील ‘मार्ड’च्या संपाला अन्य संघटनांचा पाठींबा
पावसाळा जवळ आलेला असताना गोरेगाव परिसरातील नाले कचऱ्याने भरलेले आहेत. महानगरपालिकेने नियोजित वेळेपूर्वीच नाल्यांतून नऊ लाख मेट्रिक टन कचरा काढल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही नालेसफाईबाबत मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. मग या नाल्यांमध्ये कचरा कसा, असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदारांनी नाल्यातून काढलेला नऊ मेट्रिक टन कचरा टाकला कुठे, नाल्यांमध्ये कचरा दिसत असल्यामुळे २२६ कोटी रुपये गेले कुठे, सफाईचे कंत्राट वर्षानुवर्षे कंत्राटदारांच्या एकाच गटाला कसे देण्यात येते, असे प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा… मुंबई : नागरिकांना कचऱ्याची तक्रार आता थेट व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर करता येणार
नालेसफाईमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये सर्वच जण गुंतले आहेत. नालेसफाई केवळ कागदावरच करण्यात येते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.