मुंबई : झारखंडच्या प्रभारी पोलीस महासंचालकांची बदली करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावरही पक्षपातीपणाचे आरोप होऊन झाले असताना त्यांना अभय का देण्यात आले, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा >>> लाडकी बहीण’वरून बँक कर्मचारी संतप्त; ऐन निवडणूक काळात संपाचा इशारा

झारखंडच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अनुराग गुप्ता यांची बदली करण्याचा आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने दिला आहे. पक्षपाती वर्तन, सत्ताधाऱ्यांना मदत, विरोधी नेत्यांचे दूरध्वनीवरून संभाषण चोरून ऐकणे असे आरोप असलेल्या शुक्ला यांच्या बदलीची मागणी करूनही निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

रश्मी शुक्ला यांनी पदाचा दुरुपयोग करून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांचे दूरध्वनी टॅप केल्याचे निष्पन्न झाले आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मदत करण्याची त्यांचे वर्तन होते. निवडणूक होत असलेल्या झारखंडला एक तर महाराष्ट्राला वेगळा न्याय का? – सुप्रिया श्रीनेत, प्रवक्त्या, काँग्रेस