निलेश पारवकेर यांच्या अपघाती निधनामुळे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात येत्या रविवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पारवेकर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने घरातील भांडणे तसेच पक्षांतर्गत गटबाजी या सर्व कारणांमुळे ही जागा कायम राखण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. यातूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचारासाठी धाव घ्यावी लागली तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना ठाण मांडून बसावे लागले आहे.
पारवेकर यांच्या भावाला काँग्रेसची उमेदवारी हवी होती. पण पक्षाने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. परिणामी निलेश पारवेकर यांची आई आणि भाऊ रुसून बसले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी पारवेकर यांची आई येण्यासच तयार नव्हती. शेवटी पक्षाच्या नेत्यांना मिनतवारी करावी लागली. पारवेकर यांच्या भावाने तर बंडाचे निशाण फडकविले होते. पण शेवटच्या क्षणी माघार घेतली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. पण मुख्यमंत्र्यांनी पारवेकर यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव मांडून प्रदेशाध्यक्षांवर कुरघोडी केली. काँग्रेसमधील स्थानिक गटबाजीने दगाफटका होण्याची भीती व्यक्त केली जाते. राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल काँग्रेस नेत्यांना संशय असला तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पारवेकर यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती, असे आमदार संदीप बजोरिया यांनी सांगितले.
भाजपने माजी आमदार मदन येरावार यांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही सारे काही आलबेल नाही. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्यासह शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, कीर्ती गांधी, यशोमती ठाकूर यांनी प्रचाराची धूरा सांभाळली.
निलेश पारवेकर हे राहुल गांधी ब्रिगेडमधील ओळखले जात. ही जागा गमाविल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील याचा अंदाज आल्यानेच सारे काँग्रेसजन शेवटीशेवटी प्रचारात सक्रिय झाले. ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. पण सहानभुतीच्या लाटेवर ही निवडणूक जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत.