काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्लाबोल केलाय. “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाजाच्या तीव्रतेवर मर्यादा घालण्यात आलीय. या व्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही,” असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं. तसेच मनसेच्या या भूमिकेतून मनसेमध्ये किती अज्ञान आहे हे स्पष्ट होते, असा टोला लगावला. सावंत यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन सावंत म्हणाले, “मुंबई पोलीस अॅक्ट ३८(१) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्‍याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले किंवा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते.”

“काकड आरतीही बंद, मनसेमुळे हिंदूंचे अधिक नुकसान झाले”

“पहाटेची अजान स्वतः मुस्लीम समाजाने बंद केली आहे, पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूंचे अधिक नुकसान झाले आहे. मुंबईत एकूण २४०४ मंदिरे आणि ११४४ मस्जिद आहेत. कालपर्यंत केवळ २० मंदिराकडे परवानगी आहे, तर ९२२ मस्जिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील म्हणाले ‘मोदी दोनच तास झोपतात’, आता गीतेचा संदर्भ देत सचिन सावंतांनी लगावला टोला, म्हणाले ‘हे अर्जुन…’

“महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली हे पाप कोणाचे?”

मनसेचे ऐकलं तर २४०० मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचे कारण स्पष्ट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sachin sawant criticize mns raj thackeray over supreme court judgement on loudspeakers pbs