मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये अधिक कठोर नियम जारी करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. मात्र, यावर सत्तेतीलच एक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. “लाईव्हमधून करोनाला पराभूत करण्याची निश्चित योजना देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची धमकी दिली आहे”, अशा शब्दांत संजय निरूपम यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ट्वीट करून संजय निरुपम यांनी ही टीका केली आहे. याआधी देखील संजय निरुपम यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.
“हे भितीदायक आहे!”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हवर टीका करताना ते भितीदायक असल्याचं संजय निरुपम आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. “कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेला पराभूत करण्यासाठी आणि बेड वाढवण्यासारख्या वैद्यकीय सुविधा तातडीने सुधारण्यासाठी एक निश्चित योजना देण्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांनी फक्त लॉकडाऊन लागू करण्याची अजून एक धमकी दिली. हे भितीदायक आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये संजय निरुपम म्हणाले आहेत.
Instead of coming up with a solid plan to defeat 2nd wave of #covid19 and providing some action plan to improve medical infrastructure immediately like incresing the number of beds, Hon Chief Minister has just issued another threat to impose #lockdown
It’s ridiculous. It’s scary.— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 2, 2021
“हा आजचा काय टीजर होता का?”; मुख्यमंत्र्यांना भाजपाचा सवाल
“सावधगिरी बाळगणे आणि लसीकरण हे दोन पर्याय आहेत. गेल्या वर्षी लसीकरण नव्हतं. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करुन जास्तीत जास्त लसीकरण केलं पाहिजे. मिशन टेस्टिंग बकवास आयडिया आहे. तुम्हीच चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत त्यांना पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून २५० रुपये घेतले जातात. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे. पण लॉकडाउन नको,” असं म्हणत संजय निरुपम यांनी याआधी देखील लॉकडाऊनवर टीका केली आहे.
लॉकडाऊनवर मुख्यमंत्री म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी संध्याकाळी लॉकडाऊनविषयी इशारा दिला आहे. “येत्या एक ते दोन दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनशिवाय दुसऱ्या सक्षम पर्यायावर विचार केला जाईल. पण परिस्थिती सुधारली नाही आणि पर्याय मिळाला नाही, तर लॉकडाऊन जाहीर करावा लागेल. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय. फक्त तो लागू करत नाहीये”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
Maharashtra Lockdown : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “येत्या एक-दोन दिवसांत…!”