महिला व बालविकास विभागातील २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रकरणावरून झालेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेला खुलासा अपुरा व चुकीचा असल्याचा दावा काँग्रेसने बुधवारी केला, तसेच खरेदी ई-निविदेच्या माध्यमातून करावी, असा अभिप्राय खात्याच्या सचिवांनी फाईलवर लिहिला होता, ती कागदपत्रेच काँग्रेसने सादर केली. पंकजा राजीनामा देत नाहीत तोवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज रोखून धरले जाईल, असा इशारा काँग्रेसने  दिला आहे.
दरकरारानुसार खरेदीचे पंकजा यांनी समर्थन केले. भाजप सरकारने काढलेले दोन शासकीय आदेश तसेच यापुढे खरेदी फक्त ई- निविदेच्या माध्यमातून केली जाईल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेतील वक्तव्य याचे काय झाले, असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
चिक्की व अन्य खरेदीबाबत खात्याच्या प्रधान सचिवांनी फाईलवर लिहिलेल्या शेऱ्याची कागदपत्रेच सावंत यांनी सादर केली. ई-निविदेने खरेदी व्हावी, असा अभिप्राय सचिवांनी लिहिला होता; मात्र मार्चपर्यंत दरकरारानुसार काम देण्यात यावे, असेही सचिवांनी पुढे नमूद केले आहे. २०१५-१६ वर्षांकरिता निविदा मागवावी, असाही उल्लेख केला आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभाराची भाषा करणारे मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल विखे-पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. जलयुक्त शिवाराच्या कामांचे वाटप करताना पंकजा मुंडे यांनी अनियमितता केली असून, त्याचीही कसून चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा