काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेला अर्ज आणि त्याला एका दिवसात मिळालेली माहिती यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “आम्हाला ३०-३० दिवस माहिती मिळत नाही. दुसरीकडे यांना एका दिवसात माहिती मिळते,” असा आरोप अतुल लोंढे यांनी केला. तसेच फडणवीसांनी राज्यात रोजगार आणा, विरोधी पक्षसुद्धा तुमच्यासोबत असेल, असंही नमूद केलं. ते बुधवारी (२ नोव्हेंबर) मुंबईत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतुल लोंढे म्हणाले, “३१ ऑक्टोबरला माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली जाते आणि संध्याकाळी माहिती मिळते. यात सात ते आठ विभागांचा सहभाग आहे. त्या माहिती अधिकाऱ्याला ८-१- तासात सर्व गोष्टींचं आकलन झालं का? सर्व विभागांनी एवढ्या वेळात माहिती दिली आणि यांनी माहिती अधिकार अर्जाचं उत्तर दिलं का?”

“आम्हाला ३०-३० दिवस माहिती मिळत नाही”

“आम्हाला ३०-३० दिवस माहिती मिळत नाही. माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही, अशी भलती उत्तरं आम्हाला येतात. दुसरीकडे यांना एका दिवसात माहिती मिळते,” असा आरोप अतुल लोंढे यांनी केला.

“१५ जुलैची बैठक का घेतली होती”

अतुल लोंढे पुढे म्हणाले, “मी पुराव्यानिशी सांगितलं की, मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या प्रधान सचिवांना घेऊन १५ जुलैला बैठक घेतली. त्या बैठकीत पाण्याला सवलत कशी द्यायची, तीन रुपये युनिटने वीज देणे, स्टँप ड्युटी माफ करणे असे अनेक निर्णय झाले. तेव्हा कुणाचं सरकार होतं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. तेव्हा तुमचं सरकार होतं. त्यामुळे ती बैठक का घेतली होती?”

हेही वाचा : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त उद्धव ठाकरे सहभागी होणार का? अंबादास दानवे म्हणाले, “काहीही अडचण…”

“फडणवीस कालही खोटं बोलले आणि आज पुन्हा खोटं बोलले”

“कालही खोटं बोलले आणि आज पुन्हा खोटं बोलले. आपण खोटं बोलत राहिलं की मागे काय बोललो हे लक्षात राहत नाही. त्यामुळे पुन्हा खोटं बोलावं लागतं. त्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्रातील तरुण आपले आहेत. इथं श्रेय घेत पक्षीय राजकारण करणं योग्य नाही. आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की रोजगार आणा, विरोधी पक्षसुद्धा तुमच्यासोबत असेल,” असंही लोंढे यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress spokesperson atul londhe say then will support devendra fadnavis pbs
Show comments